Sunday, April 15, 2007

श्यामची आई - एक सुंदर विचार!

"या जगात नुसते प्रेम, केवळ दया असूनच भागत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान व बळ या तीनही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत, त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ; ज्ञानहीन प्रेम तेही फुकट; प्रेमज्ञानहीन शक्ति व शक्तिहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली; परंतु दुसर्यावर प्रेम नसेल, तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावयाचा. मजजवळ ज्ञान आहे; परंतु दुसर्यावर प्रेम नसेल, तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसर्यास देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल, तर ते प्रेमही अपाय करील. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे; परंतु त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी, याचे ज्ञान जर तिला नसेल, तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये, तेही ती देईल आणि तिच्या आंधळ्या प्रेमानेच बाळ मरून जाईल! समजा, आईजवळ प्रेम आहे. ज्ञानही आहे; परंतु ती जर स्वतः अशक्त आणि पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास; ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुद्धी या तीनहींची वाढ जीवनात हवी."

श्यामची आई, रात्र अकरावी: भूतदया.
मा. श्री. साने गुरुजी.